
पालघर | प्रतिनिधी
पालघर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ५ मध्ये वातावरण चांगलेच तापले असून, माजी सत्ताधाऱ्यांवर स्थानिकांमध्ये नाराजी आहे. “माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत” असे माजी सत्ताधाऱ्यांनी सांगितले असले, तरी त्यांच्या प्रभागातील वास्तव परिस्थिती वेगळेच चित्र उभे करते.
प्रभागात फेरफटका मारताना वजलीपाडा येथील नव्याने बांधलेल्या गार्डनचे गेट तुटलेले दिसले, सुरक्षा रक्षक कॅबिनच्या काचा फोडलेल्या अवस्थेत होत्या, गार्डनमध्ये दिवाबत्तीची सोय नव्हती, गटारांवरील झाकणे तुटलेली किंवा गायब होती. रस्त्यांची अवस्था तर इतकी बिकट की नागरिकांना गाडी चालवताना “समुद्रात बोट चालवतोय की काय” असा अनुभव येत असल्याचे नागरिक सांगतात. ही परिस्थिती पाहता नाराजीचा सूर स्थानिकांमध्ये उमटताना दिसतो.
प्रभाग ५ अ : भाजपचे नैवेद्य संखे आघाडीवर
मागास प्रवर्ग प्रवर्गासाठी राखीव प्रभाग क्र. ५अ मध्ये तिघे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे नैवेद्य संखे विरुद्ध शिंदे सेनेचे राजेंद्र पाटील यांच्यात आहे. विकासातील ढिसाळ कारभार, अपूर्ण सुविधा आणि तुटपुंजे नियोजन अशा मुद्द्यांवर नागरिक स्पष्ट नाराजी व्यक्त करत असल्याने भाजपचा उमेदवार नैवेद्य संखे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
उबाठाचे शिरीष संखे यांची मते कोणत्या बाजूचा तोटा करतील हे पाहणे महत्त्वाचे असले तरी, विद्यमान वातावरण पाहता प्रभाग ५अ मध्ये भाजपची बाजू अधिक मजबूत दिसत आहे.
प्रभाग ५ब : अलका राजपूत यांची बाजी पक्की..!
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग ५ ब मध्येही तीन उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी टक्कर भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अलका राजपूत आणि शिंदे सेनेच्या पुष्पा जैन यांच्यात होणार आहे.
प्रभागातील महिला मतदारांमध्ये अलका राजपूत यांनी केलेल्या कामांबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांच्या प्रत्यक्ष लोकसंपर्कामुळे त्यांना मोठा फायदा होत आहे. दुसरीकडे पुष्पा जैन या नवीन चेहऱ्यामुळे त्यांच्या प्रचारात ताकद असली तरी स्थिर मतदार बँक आणि कामांचा तुलनात्मक इतिहास पाहता राजपूत या स्पष्ट आघाडीवर असल्याचे चित्र उमटले आहे.
प्रभाग ५ भाजपा कडे झुकतंय…
प्रभाग ५अ आणि ५ब दोन्हीतच भाजप उमेदवारांना वाढती लोकमान्यता, प्रतिसाद आणि विरोधकांच्या कामावरील नाराजी पाहता, प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजप बाजी मारेल, असे संकेत आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.