
पालघर/ मयूर ठाकूर
पालघर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य रस्त्यावर रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स. तू. कदम शाळेकडून रस्ते सुरक्षा नियमांचे खुलेआम उल्लंघन सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारित येणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या कडेला कोणतीही पूर्वपरवानगी किंवा सुरक्षात्मक उपाययोजना न करता लोखंडी फ्रेम उभी करण्याचे काम सुरू आहे.
या कामासाठी हायवा क्रेन थेट रस्त्याच्या मधोमध उभी करण्यात आली असून त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षा चालक तसेच चारचाकी वाहनांसाठी ही क्रेन अपघाताचे आमंत्रण ठरत आहे. वाहतूक जास्त असताना क्रेनला धडक बसून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यात उभ्या केलेल्या क्रेन च्या बाजूला सिग्नल मॅन ची व्यवस्था असणे गरजेचे आहे. तिकडे ते नसल्याने अपघात घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना विचारणा केली असता, त्यांना या कामाबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, वाहतूक विभाग आणि PWD यांना अंधारात ठेवून मुख्य रस्त्यावर धोकादायक पद्धतीने काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शहराच्या अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील मार्गावर अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून काम सुरू असणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. एखादा अपघात घडल्यास जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.या आधीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला चार रस्त्यावर असाच प्रकारचे काम झाले असून तक्रार करूनही उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ते आता अपघात होण्याची वाट बघत असावेत बहुतेक…?
प्रशासनाने तात्काळ या कामाची चौकशी करून रस्त्यावरील क्रेन हटवावी, आवश्यक परवानग्या व सुरक्षा उपायांची खातरजमा करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यातील अपघातास प्रशासनच जबाबदार राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया पालघरकर व्यक्त करत आहेत.