
पालघर | प्रतिनिधी
महामार्गांवर विशेषतः मनोर परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी नागरिकांना तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावणारे रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांचा पालघर वाहतूक पोलिस विभागाच्या रस्ते सुरक्षा सांगता सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
अपघातस्थळी कोणतीही विलंब न करता पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अकील सय्यद सातत्याने करीत असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत रेझीलेंट इंडिया, युनायटेड शांपोर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि सुभाष मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना उत्साहवर्धन म्हणून ₹५१००/- रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित रेझीलेंट इंडिया तर्फे अध्यक्ष राजीव चौबे आणि हर्बन्स सिंग नन्नाडे आणि भारती पाटील, नितिन उन्होने, निलेश पाटील यांनी अकील सय्यद यांच्या कार्याचे कौतुक करत, अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात, असे मत व्यक्त केले. रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असून, अकील सय्यद यांसारखे सेवाभावी व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.