
पालघर / प्रतिनिधी
मुंबई येथील जी एल सी टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रतिनिधी सौनल शेट्टी आणि राहुल चौबे यांनी आज पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक नरले यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान पालघर जिल्ह्यात नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तपास प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता वाढवणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जी एल सी टेक्नॉलॉजीकडून डिजिटल सर्व्हेलन्स, डेटा अॅनालिटिक्स, स्मार्ट पोलिसिंग सोल्युशन्स, गुन्हे प्रतिबंधक प्रणाली यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे कमी करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली. पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी,“गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असून, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे स्वागत आहे,” असे मत व्यक्त केले. तर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक नरले यांनीही टेक्नॉलॉजीच्या मदतीने पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होऊ शकते, असे सांगितले.
या भेटीमुळे भविष्यात पालघर जिल्ह्यात स्मार्ट पोलिसिंग आणि तंत्रज्ञानाधारित गुन्हे नियंत्रण प्रणाली राबवण्याच्या दिशेने सकारात्मक पावले पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.