बोईसर ग्रामपंचायतीची धडक कारवाई ; रस्त्यावर अतिक्रमण करणारे अनधिकृत फेरीवाले हटवले

Spread the love

बोईसर / प्रतिनिधी

बोईसर ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य रस्ते, चौक तसेच बाजार परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. रस्त्यावरच दुकाने व बस्थान मांडून व्यवसाय सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बोईसर ग्रामपंचायतीने सर्व पक्षीय नेत्यांच्या पाठिंब्याने मोठी कारवाई करत अनधिकृत फेरीवाल्यांना हटविले आहे.

ग्रामपंचायतीच्या या धडक मोहिमेमुळे बाजारपेठ परिसरातील रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या कारवाईस स्थानिक सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने प्रशासनाला कारवाई प्रभावीपणे राबविणे शक्य झाले.कारवाईदरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने फेरीवाल्यांना पूर्वसूचना देत सार्वजनिक रस्त्यावर व्यवसाय न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभारलेले तात्पुरते स्टॉल, हातगाड्या आणि अतिक्रमण साहित्य हटविण्यात आले.स्थानिक नागरिकांच्या मते, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे अनेकदा रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण होत होते. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत होती. आता कारवाईनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.दरम्यान, बोईसर ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे विविध स्तरातून कौतुक होत असून “सार्वजनिक रस्ते नागरिकांसाठी मोकळे राहिले पाहिजेत” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी व कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशाराही ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *