
मुंबई | प्रतिनिधी
आज मोहरम च्या दिवशी मुंबई च्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून जुबेर सिद्दीकी यांची भाजपा महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबईसह राज्यातील अल्पसंख्यांक समाजात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जुबेर सिद्दीकी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्यरत होते. अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी सक्रियपणे काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक व संघटनात्मक उपक्रम राबविण्यात आले होते.विशेषतः भायखळा आणि मुंबई परिसरातील अल्पसंख्यांक समाजामध्ये त्यांचे मजबूत जनसंपर्क जाळे आणि प्रभावी नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीनंतर मुंबईतील अल्पसंख्यांक मतदारांमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला याचा राजकीय लाभ होऊ शकतो. सिद्दीकी यांच्या नियुक्तीमुळे अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांना भाजपशी जोडण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.जुबेर सिद्दीकी यांनी नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.