वाडा नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडची संरक्षक भिंत कोसळली; गटार बांधकामामुळे भिंत कमकुवत झाल्याचा स्थानिकांचा आरोप, मुख्याधिकारी व अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…?

Spread the love

वाडा | प्रतिनिधी

वाडा नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडची संरक्षक भिंत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची गंभीर घटना समोर आली असून, या घटनेमुळे नगरपंचायतीच्या विकासकामांच्या दर्जाबाबत आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भिंत कोसळल्याने डम्पिंग ग्राउंडमधील दूषित पाणी व कचऱ्याचा प्रवाह आजूबाजूच्या शेतांमध्ये गेल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी केला असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याबरोबरच आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी डम्पिंग ग्राउंडच्या आतील बाजूस संरक्षक भिंतीला लागून गटाराचे बांधकाम करण्यात आले होते. हे काम करताना भिंतीच्या पायालगत मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. मात्र, त्यानंतर भिंतीचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी भिंतीचा आधार कमकुवत झाला आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मातीची धूप होऊन भिंतीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला. अखेर हा ताण सहन न झाल्याने संपूर्ण संरक्षक भिंत कोसळल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.स्थानिकांचे म्हणणे आहे की, गटाराचे काम करताना अभियांत्रिकी निकष, मातीची धारणक्षमता, पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह आणि संरक्षक भिंतीची सुरक्षितता यांचा पुरेसा विचार करण्यात आला नाही. काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही नियमित तपासणी किंवा सुरक्षिततेचा आढावा घेतला नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.भिंत कोसळल्यानंतर डम्पिंग ग्राउंडमधील दूषित पाणी आणि कचऱ्याचे पाणी शेजारील शेतीमध्ये पसरल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, दूषित पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही ही बाब गंभीर मानली जात असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.या संपूर्ण प्रकरणात वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज स्पष्टे आणि संबंधित अभियंता घनवट यांच्या देखरेख व जबाबदारीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विकासकामांचे योग्य नियोजन, तांत्रिक पडताळणी आणि गुणवत्तेची प्रभावी देखरेख झाली असती, तर ही परिस्थिती टाळता आली असती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, संरक्षक भिंत कोसळल्यामुळे डम्पिंग ग्राउंड परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, उर्वरित भिंतीचा काही भागही धोकादायक स्थितीत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

त्यामुळे भविष्यात आणखी भिंतीचा भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नागरिकांनी या घटनेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून भिंत कोसळण्यामागील नेमके कारण शोधावे, संबंधित कामाची गुणवत्ता तपासावी, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करावी आणि संरक्षक भिंतीचे पुनर्बांधकाम दर्जेदार व तांत्रिक निकषांचे पालन करून तातडीने करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, या संदर्भात प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज स्पष्टे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या आरोपांबाबत नगरपंचायतीची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *