बाणगंगेचे प्रदूषण आणि ग्रामपंचायतींमधील सीमावाद: ऐतिहासिक नदीची दयनीय अवस्था

Spread the love

पास्थळ | रोहन राणा
प्रभू श्रीरामाने बाण मारून उगम पावल्याची धार्मिक आणि ऐतिहासिक मान्यता असलेली बाणगंगा नदी आज गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून तिची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकेकाळी स्वच्छ, पवित्र आणि जीवनदायी असलेली ही नदी आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी भरून गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


स्थानिक नागरिकांच्या मते, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, घरगुती कचरा आणि इतर घातक पदार्थ टाकले जात आहेत. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असून, जलप्रदूषणासोबतच परिसरातील पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


या सर्व परिस्थितीमागे प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ग्रामपंचायतींमधील सीमावाद हे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. बाणगंगेचा वादग्रस्त भाग पास्थळ आणि परनाळी ग्रामपंचायतींच्या हद्दीत येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. पास्थळ ग्रामपंचायत हा भाग परनाळीच्या हद्दीत येतो असे सांगते, तर परनाळी ग्रामपंचायत उलट दावा करत आहे. परिणामी, नदीच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.


पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा सीमावाद मिटवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच नदीपात्रातील कचरा हटवून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, दोषींवर कारवाई करावी आणि नदीचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.


दरम्यान, संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तातडीने पावले उचलली नाहीत, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या बाणगंगेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता ठोस कृतीची गरज असल्याचे नागरिकांकडून स्पष्टपणे सांगितले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *