बोईसर येथील विराज कंपनीच्या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद; जनसुनावणी यशस्वी

Spread the love

पालघर | सन्नान शेख

पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात प्रस्तावित विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी शांततापूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या सुनावणीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा होत प्रकल्पाबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला.


सुनावणीदरम्यान उपस्थित नागरिकांनी आपल्या शंका व सूचना मांडल्या असल्या तरी, एकूणच प्रकल्पामुळे स्थानिक भागात रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा सकारात्मक सूर अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला. विशेषतः तरुणांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.


काही ग्रामस्थांनी ग्रामसभेत पूर्वचर्चा व्हावी, तसेच सुनावणीसाठी अधिक सोयीस्कर ठिकाण निवडावे, अशा सूचना मांडल्या. याचबरोबर नदी व नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी कंपनीने आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


साधारण, मान, वारंगडे, बारीपाडा, सुतारपाडा आणि गुंडले येथील सुमारे ३०० ते ४०० ग्रामस्थांनी या जनसुनावणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली मते मांडली. काही आक्षेप नोंदवले गेले असले तरी, संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.


एकंदरित, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने ही जनसुनावणी यशस्वी ठरली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून अधिकाऱ्यांनी सुनावणी संपल्याची घोषणा केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *