
पालघर | सन्नान शेख
बोईसर परिसरातील विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी बुधवारी (दि. ०८ एप्रिल २०२६) संमिश्र वातावरणात पार पडली.

या सुनावणीत विविध मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली असून प्रकल्पाबाबत समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका स्पष्टपणे समोर आल्या.सुनावणीदरम्यान काही ग्रामस्थांनी प्रकल्पावर चर्चा होण्यापूर्वी संबंधित गावांमध्ये ग्रामसभांद्वारे पूर्वचर्चा व्हावी, अशी मागणी केली. तसेच सुनावणीचे ठिकाण सर्वांना सोयीस्कर नसल्याची भावना व्यक्त करत पर्यायी ठिकाणाची व्यवस्था करण्याची सूचनाही करण्यात आली.पर्यावरणाच्या दृष्टीनेही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विशेषतः नदी व नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची सखोल तपासणी व्हावी, असेही मत मांडण्यात आले.

दुसरीकडे, या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास काही उपस्थितांनी व्यक्त केला. औद्योगिक विकासामुळे परिसरातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे समर्थनकर्त्यांचे म्हणणे होते.या जनसुनावणीस साधारण, मान, वारंगडे, बारीपाडा, सुतारपाडा आणि गुंडले येथील सुमारे ३०० ते ४०० ग्रामस्थ उपस्थित होते. अनेकांनी आपापली मते मांडत काही आक्षेप नोंदवले.दरम्यान, उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जनसुनावणी पार पाडण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
तसेच नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनांचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सुनावणीच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानत अधिकाऱ्यांनी जनसुनावणी पूर्ण झाल्याची घोषणा केली.