तवा ब्रिजवरील धोकादायक सिमेंट बॅरिकेट्स हटवण्याचा निर्णयकंत्राटदाराची कबुली; प्लास्टिक बॅरिकेट्स लावण्यास कंत्राटदार तयार

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा येथील पुलाच्या दुरुस्ती कामादरम्यान लावण्यात आलेल्या सिमेंट बॅरिकेट्समुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वाहनचालकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदार आणि सुरक्षा सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांना तवा ब्रिज येथे बोलावून महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या. कंत्राटदार शिवशाई कन्स्ट्रक्शन यांनी पुलाच्या दुरुस्तीचे काम गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यामुळे थांबल्याची कबुली दिली. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने सिमेंट बॅरिकेट्स लावणे चुकीचे ठरल्याचे मान्य करत तात्काळ ते हटवून त्यांच्या जागी मानकांनुसार प्लास्टिक बॅरिकेट्स बसवण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून सिमेंट बॅरिकेट्समुळे होत असलेल्या अपघातांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य परावर्तक (रिफ्लेक्टर) आणि इशारा फलक नसल्याने अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागले होते.या चर्चेदरम्यान “मृत्युंजय दूत” तसेच “रेझिलेंट इंडिया” चे सदस्य हर्बनससिंग नन्नाडे, भारती पाटील, मयूर ठाकूर, मैनुद्दीन खान यांनी प्रशासन आणि कंत्राटदार यांना जाब विचारत तातडीने सुरक्षितता उपाययोजना राबवण्याची मागणी केली.बैठकीस कंत्राटदार कंपनीचे संचालक दिलेश संखे, तसेच NHAI च्या सुरक्षा सल्लागार कंपनीचे अधिकारी संतोष सैनी आणि राय हेही उपस्थित होते.सुरक्षिततेकडे दुर्लक्ष की निष्काळजीपणा?या संपूर्ण प्रकारामुळे महामार्गावरील कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जाते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिमेंट बॅरिकेट्समुळे अपघातांचा धोका वाढत असताना योग्य ती खबरदारी का घेण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तात्काळ अंमलबजावणीची गरजकंत्राटदाराने दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर सिमेंट बॅरिकेट्स हटवून प्लास्टिक बॅरिकेट्स, रिफ्लेक्टर आणि आवश्यक सूचना फलक बसवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.“जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा!”महामार्गावरील दुरुस्ती कामे करताना सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा अशा निष्काळजीपणाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *