
पालघर | मयूर ठाकूर
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या दुरुस्ती कामादरम्यान कंत्राटदाराकडून गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. दुरुस्तीच्या ठिकाणी तात्पुरत्या सुरक्षिततेसाठी प्लास्टिक बॅरिकेट्स लावणे अपेक्षित असताना, त्याऐवजी सिमेंटचे जड बॅरिकेट्स उभारण्यात आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचा धोका वाढला आहे.

स्थानिक वाहनचालकांच्या मते, रात्रीच्या वेळी या बॅरिकेट्स स्पष्ट दिसत नसल्याने अनेक वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि छोट्या वाहनांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. काही ठिकाणी कोणतेही परावर्तक (रिफ्लेक्टर) किंवा योग्य सूचना फलक नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत या ठिकाणी लहान-मोठे अनेक अपघात घडले असून वाहनांचे नुकसान तर झालेच, पण काही प्रवासी जखमीही झाले आहेत. तरीही संबंधित कंत्राटदार आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद?
या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुरक्षा नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असताना कोणतीही कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून त्वरित सिमेंट बॅरिकेट्स हटवून त्याऐवजी मानकांनुसार प्लास्टिक बॅरिकेट्स, रिफ्लेक्टर आणि योग्य साईनबोर्ड लावण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहन धडकले असता, भीषण अपघात घडून जीवित्त हानी झाल्यास जवाबदार कोण…?
“अपघात झाल्यावरच जाग येणार का?”
सध्या तरी प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे हा महामार्ग अपघातांचा सापळा बनत चालला आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच उपाययोजना केल्या जाणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वाहतूक नियमांनुसार, अशा दुरुस्तीच्या कामांदरम्यान हलके, लवचिक आणि स्पष्ट दिसणारे प्लास्टिक बॅरिकेट्स, चेतावणी फलक आणि प्रकाश व्यवस्था आवश्यक असते. मात्र, येथे सिमेंट बॅरिकेट्स लावून थेट वाहनचालकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.