माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण

Spread the love

मालमत्ता कर माफी व गहाळ प्रॉपर्टीचा प्रश्न प्रलंबितच


पालघर | प्रतिनिधी
माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. पालघर)
यांनी पालघर नगर परिषदेकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात अन्नत्याग व पाणी त्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मोरे कुरण रोड, पालघर येथे हे उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.


डॉ. तायडे यांनी 19 वर्षे देशसेवा केल्यानंतर पालघर येथे स्वतःचे घर बांधले आहे. पालघर नगर परिषदेकडून घर बांधकामाची परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले असून 01 जुलै 2009 रोजी मालमत्ता करही भरलेला आहे. संबंधित मालमत्तेचा जुना प्रॉपर्टी नंबर 4021, सी झोन, पालघर पूर्व असा आहे.


माजी सैनिकांना मालमत्ता कर माफी द्यावी, यासाठी डॉ. तायडे यांनी 23 फेब्रुवारी 2011 रोजी पालघर नगर परिषद, नगराध्यक्ष व नगरसेवकांकडे निवेदन दिले होते. त्यासोबत कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील करमाफीचे आदेशही जोडून दिले होते. मात्र त्यानंतर 2011 पासून आजतागायत पालघर नगर परिषदेकडून एकदाही मालमत्ता कराचे बिल देण्यात आलेले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


तसेच 2011 नंतर त्यांची संबंधित मालमत्ता नगर परिषदेच्या संगणक व दप्तरातून गहाळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रत्येक वर्षी मालमत्ता कराचे मागणीपत्र देणे बंधनकारक असतानाही ते देण्यात आले नाही, असे ते म्हणाले.
याशिवाय घोलवीरा परिसरात त्यांच्या नावावर असलेली एकच मालमत्ता असताना नगर परिषदेकडून दोन मालमत्ता दाखवण्यात आल्या असून, त्या प्रत्यक्ष जागेवर दाखवून त्यांच्या ताब्यात देण्यात याव्यात, अशीही त्यांची मागणी आहे.


डॉ. तायडे हे मागासवर्गीय व माजी सैनिक असून नगर परिषद सैनिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी 13 ऑगस्ट 2025 रोजी हुतात्मा चौक, पालघर येथे त्यांनी आमरण उपोषण केले होते. त्या वेळी आमदार राजेंद्र गावित यांनी स्वतः पुढाकार घेत उपोषण सोडवले होते. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, मनिषा निमकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, इतर प्रतिनिधी, पत्रकार व नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र त्यानंतरही आजतागायत कोणताही ठोस न्याय न मिळाल्याने पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
या उपोषणात डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे यांच्यासह श्री अंकुश बाळासाहेब शिंदे (जि. परभणी, ता. सोनपेठ, डिघोळ) सहभागी आहेत. उपोषणादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच या उपोषणावर होणारा खर्च शासन व नगर परिषद यांनी करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
2011 पासून दिलेल्या करमाफी अर्जावर निर्णय होईपर्यंत व घोलवीरा येथील मालमत्तेचा ताबा मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार माजी सैनिक डॉ. तायडे यांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *