
पालघर | प्रतिनिधी
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तर्फे सेफ्टी ऑफिसर या महत्त्वाच्या पदाची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सुरक्षाविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी महामार्ग पोलीस चौकी दुर्वेश येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महामार्ग पोलीस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे, अपूर्ण सेवा रस्ते, अयोग्य डायव्हर्जन, अपुरे सूचना फलक, रस्त्यावरील खड्डे तसेच रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थेअभावी निर्माण होणारे धोके याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर आज सोमवारी कासा पोलीस ठाणे येथे दुसरी बैठक पार पडली. या बैठकीतही महामार्ग क्रमांक 48 वरील सुरक्षिततेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. विशेषतः सेफ्टी ऑफिसर नसल्यामुळे रस्त्यावरील कामांची देखरेख, सुरक्षा ऑडिट आणि तात्काळ उपाययोजना करण्यास अडथळे येत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी बैठकीदरम्यान महामार्गावरील अवजड वाहनांची बेदरकार पार्किंग, चुकीच्या ठिकाणी उघडे कट, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्गांचा अभाव तसेच अपघातानंतर तातडीच्या मदतीचा अभाव या बाबींकडे लक्ष वेधले. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एनएचएआयने तातडीने सेफ्टी ऑफिसरची नियुक्ती करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
या बैठकीत काही तात्पुरत्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी सेफ्टी ऑफिसरची नियुक्ती अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अन्यथा भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही उपस्थितांनी दिला.
आता एनएचएआय या गंभीर विषयाकडे किती गांभीर्याने पाहते आणि महामार्ग क्रमांक 48 वरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.