Naprod कंपनीखाली सापडले छुपे पाइप, परिसरात खळबळ

पालघर | प्रतिनिधी
MIDC तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. Naprod या औद्योगिक कंपनीच्या थेट खाली जमिनीत लपवून ठेवलेले छुपे पाइप आढळून आल्यानंतर या प्रकरणात मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. या पाइपद्वारे कोणतीही प्रक्रिया न करता केमिकलयुक्त, विषारी सांडपाणी बेकायदेशीररीत्या बाहेर सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रदूषणाविरोधात केलेल्या पूर्वीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबर 2025 रोजी MIDC प्रशासनाने JCB च्या साहाय्याने खोदकाम व साफसफाईची कारवाई हाती घेतली. या कारवाईदरम्यान Naprod कंपनीच्या मागील भागातून तसेच थेट कंपनीच्या खाली जमिनीत घातलेले गुप्त पाइप प्रत्यक्ष उघडकीस आले, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

या पाइपद्वारे वाहणारे रासायनिक दूषित पाणी आसपासच्या गावांच्या दिशेने सोडले जात असल्याचा आधी करण्यात आलेल्या तक्रारींना आता ठोस दुजोरा मिळाल्याचे समोर येत आहे. हा प्रकार जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 1974, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार विजय बाळू गांगुर्डे (उपजिल्हाध्यक्ष, पालघर) आणि धिरज गावड (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) यांनी संबंधित यंत्रणांकडे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून पूर्वनियोजित, गुन्हेगारी हेतूने करण्यात आलेली कारवाई आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जमीन, भूजल, नदीप्रवाह आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम झाला आहे.
तक्रारदारांनी स्पष्ट केले की, सध्या तपासात एका कंपनीचा पर्दाफाश झाला असला, तरी MIDC तारापूर औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारे प्रदूषण करणारे आणखी शेकडो कारखाने कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारांकडे वेळेत कठोर कारवाई न केल्यास त्याचे दुष्परिणाम पुढील पिढ्यांनादेखील भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणी Naprod कंपनीविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, उद्योग सील करावा, MPCB मार्फत पाण्याचे नमुने घेऊन अहवाल सार्वजनिक करावा तसेच दोषी MIDC व MPCB अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांनी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, उच्च न्यायालय आणि माध्यमांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. यानंतर प्रशासन, MIDC आणि MPCB कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई पालघर न्यूज लवकरच पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या गण आणि गटाचे माजी सदस्यांन कडून झालेली कामे आणि कामातील भ्रष्टाचार या बाबत लवकरच सविस्तर बातमी पत्र सुरु करणार आहेत, वाचत रहा मुंबई पालघर न्यूज…….