
पालघर/प्रतिनिधी
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदार ‘निर्मल इन्फ्रा’ कंपनीकडून सुरू असलेल्या पिवळ्या आणि पांढऱ्या पट्टे (रोड मार्किंग) मारण्याच्या कामात गंभीर बेपर्वाई समोर आली आहे. या कामासाठी नियमांनुसार औद्योगिक वापरासाठीचे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात मात्र कंपनीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
महामार्गावर सुरू असलेल्या या कामादरम्यान संबंधित यंत्रणा गरम करण्यासाठी उच्च दाबाचा गॅस लागतो. अशा वेळी घरगुती सिलेंडरचा वापर केल्याने स्फोटाचा मोठा धोका, कामगार तसेच नागरिकांच्या जीवितास गंभीर दुर्घटनेचा संभव निर्माण होतो. तसेच अशा प्रकारचा वापर गॅस कंपन्यांच्या नियमांना व सरकारी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांना सरळसरळ धरून विरोधात आहे.
कंत्राटदार कंपनीवर आधीच कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता सुरक्षा नियम धाब्यावर बसवून महामार्गावर असे काम केल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बाबत तहसीलदार पालघर यांना तक्रार करण्यात आलेली असून, महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, तसेच जबाबदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या घटनेमुळे महामार्गावरील कामकाज किती सुरक्षित पद्धतीने होत आहे, कामाच्या गुणवत्तेबरोबरच सुरक्षा नियमांकडेही दुर्लक्ष होत आहे का? असा गंभीर प्रश्नही उपस्थित झाला आहे. प्रशासनाने याची चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.