एनएचएआय कंत्राटदारांच्या चुकीमुळे कंटेनर थेट नदीत कोसळला

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (NH-48) कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास, मुंबई–गुजरात लेनवर चिंचपाडा येथील तवा नदी पुलावरून एक कंटेनर थेट नदीत कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा अपघात गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणाचे उदाहरण ठरत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. मात्र महामार्गावर योग्य साईड पट्टी, संरक्षक रेलिंग आणि सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे कंटेनर थेट पुलावरून खाली नदीत कोसळला. पुलावर अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली संरक्षक व्यवस्था असती, तर हा अपघात टाळता आला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणी व दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या कामांदरम्यान भारतीय रस्ते काँग्रेस (IRC) चे नियम व सुरक्षा निकष सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. परिणामी या महामार्गावर सातत्याने अपघात घडत असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानासह जीवितहानी देखील होत आहे.

हायवे मुत्यूंजय दूतांचे कार्यकर्ते याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत असून, त्यांच्या म्हणण्यानुसार एनएचएआयचे अधिकारी सुहास चिटणीस यांचे आपल्या कंत्राटदारांवर कोणतेही प्रभावी नियंत्रण नाही. त्यामुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असून, प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एनएचएआयकडून तातडीने चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच महामार्गावरील सर्व पुलांवर व धोकादायक ठिकाणी सुरक्षा रेलिंग, साईड पट्टी आणि आवश्यक सूचना फलक तात्काळ बसवावेत, अशी मागणी केली आहे.

वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे मुंबई–अहमदाबाद महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत असून, अपघात झाल्यावर उपाययोजना करण्याऐवजी अपघात होऊ नयेत यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आता तीव्रतेने व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *