एक्सप्रेसवे अप्रोच रोड नसल्याबाबत टीमा कडून नाराजी

बोईसर | प्रतिनिधी
बोईसर एमआयडीसी परिसरात टीमा (TIMA) यांच्या माध्यमातून व लघु उद्योग भारतीच्या सहयोगाने लघु उद्योगांना चालना मिळावी तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने टीमा सभागृहाच्या शेजारी इंडस्ट्रियल इक्स्फो या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी लघु उद्योग हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ असून, उद्योगांच्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या वेळी टीमा चे पदाधिकारी, लघु उद्योग भारतीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच बोईसर एमआयडीसीतील अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उद्योगांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन व नेटवर्किंगची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

दरम्यान, मुंबई–दिल्ली एक्सप्रेसवे कॉरिडॉर महामार्गाला बोईसरसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक ठिकाणी चढ–उतार (अप्रोच) रस्ता देण्यात न आल्याबाबत टीमा चे पदाधिकारी ब्रिजेश उर्फ पापा ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बोईसर एमआयडीसी हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असूनही या ठिकाणी अप्रोच रोड नसल्याने उद्योग व वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र वैद्य यांना याबाबतचे निवेदन पत्रही देण्यात आले. या विषयावर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.