
पालघर / प्रतिनिधी
पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चार रस्ता) येथे आज वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत वर्दळीच्या या चौकात केवळ एकाच ट्राफिक पोलिसाच्या भरवशावर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
यासंदर्भात वाहतूक प्रभारी अधिकारी सुरेश साळूंखे यांनी सांगितले की, उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी आजपासूनच अनेक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक विभागात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून, याचा परिणाम आजच्या वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.
या वाहतूक कोंडीदरम्यान अनेक रिक्षाचालक आणि कारचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत मिळेल त्या दिशेने, अगदी उलट्या दिशेनेही वाहने चालवली. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून काही काळासाठी चौकात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
नागरिकांनी वाहतूक पोलीस प्रशासनाने अशा वर्दळीच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.