
वाडा | विजय बसवत
वाडा–भिवंडी रोडवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात धूळ पसरल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावरून एखादी वाहन जाताच मोठ्या प्रमाणात धुळीचे ढग उडत असून त्यामुळे श्वास घेणेही कठीण होऊ लागले आहे. या धुळीकणांमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याची खोदाई, अपूर्ण डांबरीकरण, तसेच सतत सुरू असलेल्या जडवाहतूक यामुळे स्थिती अधिकच बिकट झाली आहे. धुळीमुळे अनेकांना खोकला, श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि अलर्जीच्या तक्रारी वाढल्या आहेत. “सकाळ-संध्याकाळ हा मार्ग वापरणं म्हणजे धूळ गिळावी लागते,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही संबंधित विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. रस्त्यावर नियमित पाणीफेक, तातडीने दुरुस्ती आणि डांबरीकरणाची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात आरोग्याच्या समस्या अधिकच गंभीर रूप धारण करतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.