
डहाणू | सन्नान शेख
डहाणू नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसने या वेळी अनुभवी, तडफदार तसेच शिक्षित तरुणांना संधी देत एक मजबूत पथक रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे एकूण पाच उमेदवार या वेळी मैदानात असून, त्यापैकी प्रत्येक उमेदवार आपल्या प्रभागात उत्साहात प्रचाराला सुरुवात करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, वार्ड क्र. १० मधून लोकांच्या हक्कांसाठी लेखणीने लढा देणारे अनुभवी पत्रकार रफीक घाची यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. स्थानिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सातत्याने मांडत राहिल्यामुळे त्यांना मिळालेला हा सन्मान मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

त्याचबरोबर या वेळी काँग्रेसने तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवारांवरही विश्वास दाखवला आहे.ऍड. जय मावळे, समर्थ मल्हारी, सागर पवार यांसारखे ऊर्जावान, अभ्यासू आणि नव्या विचारांचे युवा उमेदवार काँग्रेसच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे डहाणूत काँग्रेसचा लढा यावेळी अधिक ताकदीचा आणि योजनाबद्ध होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
डहाणू नगरपरिषदेची संपूर्ण जबाबदारी यावेळी राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी आणि भारत यात्री कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देत,“डहाणूत सुधारणा, पारदर्शकता आणि हुकूमशाहीविरोधातील जनतेच्या लढ्याला काँग्रेस निश्चितच विजय मिळवून देईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकंदरीत, काँग्रेसने अनुभवी नेतृत्वासोबत युवाशक्तीचे व शक्तीशाली संघटनशक्तीचे दर्शन घडवत डहाणूतील निवडणुकीत मोठी लढत उभी केली आहे.