
पालघर | प्रतिनिधी (सन्नान शेख)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला असून या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलावर अलीकडेच सिमेंट काँक्रीटचे काम करण्यात आले होते. या कामामुळे पुलावरील कथड्यांची उंची कमी झाली होती, ज्यामुळे मोठ्या वाहनांच्या हालचालीदरम्यान पुलावर ताण निर्माण होत होता.
याच पुलावर काही महिन्यांपूर्वी एक केमिकल टँकर खाली कोसळण्याची घटना घडली होती. त्या वेळीच या पुलाचे सेफ्टी ऑडिट तातडीने करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निष्क्रीय भूमिकेमुळे हे ऑडिट अद्याप झालेले नाही.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, NHAI अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांची मागणी आहे की, पुलाचे त्वरित दुरुस्ती आणि संपूर्ण संरचनात्मक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून मोठा अपघात टळू शकेल.
प्रशासनाकडून घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राटदाराचे अधिकारी दाखल झाले असून, वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.