अवैध प्रवासी वाहतुकीवर पालघर वाहतूक पोलिसांची कारवाई; वऱ्हाडी मंडळींना बसने सुरक्षित पोहोचवले

Spread the love


पालघर | प्रतिनिधी


बोईसर येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात पिकअप आणि मालवाहू टेम्पो गाड्यांचा वापर करून नागरिकांची वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर पालघर वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवैध प्रवासी वाहतूक थांबवली आणि टेम्पोमधील वऱ्हाडी मंडळींना सुरक्षितरीत्या बसमधून इच्छित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था केली.
काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे लग्न समारंभाहून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात होऊन १३ आदिवासी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला होता. त्या अपघातातून बोध घेत पालघर पोलिस प्रशासनाने अवैध आणि धोकादायक प्रवासी वाहतुकीविरोधात अधिक सतर्क भूमिका घेतली आहे.
बोईसर परिसरात सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नागरिकांना मालवाहू वाहनांमधून नेले जात असल्याची माहिती वाहतूक विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. यावेळी अनेक पिकअप आणि मालवाहू टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आढळून आले. पोलिसांनी संबंधित वाहने तात्काळ थांबवून प्रवाशांना खाली उतरवले.
विशेष म्हणजे, पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक जबाबदारी पार पाडत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. उन्हात आणि गैरसोयीच्या परिस्थितीत नागरिक अडकून पडू नयेत म्हणून वाहतूक विभागाने बसची व्यवस्था करून वऱ्हाडी मंडळींना सुरक्षितपणे विवाहस्थळी पोहोचवले. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मालवाहू वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे.”
धानिवरी दुर्घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भविष्यात संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *