
🚴♂️
पालघर | मयूर ठाकूर
बोईसर फ्लायर्स ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेला डिकॅथलॉन स्पोर्ट्स फेस्टिव्हल पालघर तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या उत्सवाच्या निमित्ताने बोईसर ते बोर्डी आणि पुन्हा बोईसर असा तब्बल १०० किलोमीटर सायकलिंग राईडचे आयोजन करण्यात आले होते.

या सायकलिंग उपक्रमात विरार ते डहाणू परिसरातील अनेक सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, सहभागी झालेल्या जवळपास सर्व सायकलपटूंनी यशस्वीरित्या १०० किलोमीटरचे आव्हान पूर्ण केले. या यशाबद्दल डिकॅथलॉन तर्फे सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र, पदक तसेच आकर्षक गिफ्ट बॅग देऊन गौरविण्यात आले.

प्रखर उन्हाचा सामना करत सायकलपटूंनी संपूर्ण राईडदरम्यान जबरदस्त उत्साह, जिद्द आणि चिकाटी दाखवली. बोईसर फ्लायर्स ग्रुप तर्फे वर्षभर अशा विविध सायकलिंग उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामागचा उद्देश सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देणे, निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती करणे हा आहे.

ग्रुपच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे निसर्गरम्य पालघर जिल्ह्यात सायकलिंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

ग्रामीण भागापर्यंत सायकलिंगचे महत्त्व पोहोचवण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.आजच्या या यशस्वी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
