
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्यानंतर कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तातडीने कामाला सुरुवात केली असून सध्या ते पूर्णपणे ‘ऍक्शन मोड’मध्ये दिसून येत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांनी संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे.आज पालघर येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळात पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी बोलताना कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितले की,“पालघर जिल्ह्यात काँग्रेसचे पुन्हा जुने वैभव निर्माण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राहील.”बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. विशेषतः युवकांना पक्षात संधी उपलब्ध करून देणे, बूथ स्तरावर संघटना मजबूत करणे, गावागावात पक्षाची पकड वाढवणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद वाढवण्यावर भर देत, “फक्त कार्यालयात बसून राजकारण न करता थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या भावना आणि अडचणी समजून घेणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
📌 उद्यापासून जिल्हाभर दौरापक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी कॅप्टन सत्यम ठाकूर उद्यापासून पालघर, बोईसर, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या भागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थकांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहेत. प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक बैठका घेऊन स्थानिक पातळीवरील प्रश्न, पक्षाची स्थिती आणि भविष्यातील रणनीती यावर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली.त्यांच्या या आक्रमक आणि संघटनाभिमुख भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🤝 बैठकीस उपस्थित मान्यवरबैठकीस कॅप्टन सत्यम ठाकूर, सिकंदर शेख, रविश नाचन, चिराग देसाई, रोशन पाटील, मनोहर दांडेकर, रसिकलाल भानुशाली, ॲड. दिपक सावले, रामप्रकाश निराला, मोईन शेख, किरण पाटील, राजेंद्र तामोरे, संदीप पांडे, संदीप मेणे, सुनील इंगोले, राजीव शुक्ला, असद चुनावाला, शैलेश ठाकूर, हिमांशू दुबे, ॲड. प्रवीण मेहेर, अमरसिंग ठाकूर, ऐराब पटेल तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.