
पालघर | सन्नान शेख
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात १८ मे रोजी संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला होता. धानेवरी गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर बापूगाव येथील आदिवासी समाजातील नागरिक साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतत असताना त्यांच्या वाहनाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १३ निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज, २३ मे रोजी पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष Captain Satyam Thakur यांनी डहाणू तालुका अध्यक्षा वर्षा वायदा, एसटी सेल अध्यक्ष राहुल पाचाळकर, सामाजिक कार्यकर्ते भारत वायदा आणि इतर सहकाऱ्यांसह दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम लाखत पाडा, बापूगाव येथे जाऊन अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.अपघातात आपल्या वडिलांना गमावलेल्या तिसरी आणि चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींची परिस्थिती पाहून कॅप्टन सत्याम ठाकूर भावुक झाले. या दोन्ही मुलींच्या आयुष्यात आता फक्त आईच उरली असल्याचे समजताच त्यांनी तत्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्याशी संवाद साधला.त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दोन्ही मुलींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसतर्फे स्वीकारण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच, ३१ मे रोजी होणाऱ्या दिवसभराच्या अंतिम विधीसाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या गरजांची पूर्तताही करण्यात आली.

पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांविषयी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांनी वारंवार मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला.ग्रामस्थांच्या मागणीनुसार काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अपघातस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी महामार्गावर सर्व्हिस रोड नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.“सर्व्हिस रोड नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात”गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिकांसाठी कोणताही स्वतंत्र सर्व्हिस रोड उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेकदा महामार्गाच्या चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागतो. याच गंभीर दुर्लक्षामुळे इतकी मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.धानेवरी गावाचे सरपंच शैलेश कोर्डा यांनी देखील मागील दोन वर्षांपासून धानेवरीसह आसपासच्या पाच ते सहा गावांसाठी सुरक्षित सर्व्हिस रोड आणि इंटरसेक्शनची मागणी सातत्याने करण्यात येत असल्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना कॅप्टन सत्याम ठाकूर यांनी, “एक व्यक्ती म्हणून, काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आणि पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांच्या या न्याय्य लढ्यात मी कायम त्यांच्या सोबत उभा राहीन,” अशी ग्वाही दिली.तसेच, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.