
पालघर / प्रतिनिधी
डहाणू तालुक्यातील धानीवरी येथे झालेल्या भीषण अपघातात १३ आदिवासी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आणि २० आदिवासी बांधव गंभीर जखमी असताना संपूर्ण पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरलेली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde हे शनिवारी बोईसर येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने संतापाची लाट उसळू लागली आहे.धानीवरी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले असून आदिवासी समाजात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना राज्य सरकारमधील वरिष्ठ नेतृत्वाने घटनास्थळी भेट देऊन सांत्वन करणे अपेक्षित असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र, अशा संवेदनशील परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डहाणूकडे पाठ फिरवून बोईसर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बोईसर येथे Aadhar Pratishthan यांच्या वतीने आदिवासी बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिती म्हणून येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे महत्त्व असले तरी सध्याच्या जिल्ह्यातील दुःखद परिस्थितीत अशा कार्यक्रमात सहभाग घेणे योग्य आहे का….? असा सवाल अनेक सामाजिक /राजकीय कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.अपघातातील मृत आदिवासी बांधवांच्या कुटुंबीयांना अद्याप सावरणे कठीण झालेले असताना, राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी प्रथम पालघर जिल्ह्यातील पीडित कुटुंबांना धीर देणे आणि गंभीर अपघातग्रस्त रुग्णांची पाहणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारने आदिवासी समाजाच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी केली आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या प्रस्तावित बोईसर दौऱ्याविरोधात स्थानिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पालघर जिल्ह्यावर दुःखाचे सावट असताना होणाऱ्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.