महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे आणखी एक उत्तम उदाहरण

Spread the love

पालघर / मयूर ठाकूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे आणखी एक कौतुकास्पद उदाहरण समोर आले असून, पालघर आगारातील महिला वाहक सौ. नेहा पाटील यांनी आपल्या प्रामाणिकपणातून महामंडळाची प्रतिमा अधिक उंचावली आहे.
दिनांक २० मे २०२६ रोजी पालघर ते बोईसर या मार्गावर बस सेवा करत असताना महिला वाहक सौ. नेहा पाटील यांना बसमधील एका आसनावर एक महिला प्रवाशाची पर्स पडलेली आढळून आली. बसमधील सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर तपासणी करताना ही पर्स त्यांच्या निदर्शनास आली.
सदर पर्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच ५ हजार रुपये रोख रक्कम असल्याचे दिसून आले. पर्समध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर हरवलेली पर्स ही एका महिला प्रवाशाची असल्याचे स्पष्ट झाले.
महिला प्रवाशाशी संपर्क झाल्यानंतर सौ. नेहा पाटील यांनी अत्यंत प्रामाणिकपणे संबंधित महिलेच्या मुलाच्या ताब्यात मोबाईल, रोख रक्कम आणि पर्स सुपूर्द केली. हरवलेली मौल्यवान वस्तू सुखरूप परत मिळाल्याने संबंधित कुटुंबाने महिला वाहकांचे आभार मानले असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आजच्या काळात अशा प्रकारची प्रामाणिक सेवा दुर्मिळ होत चालली असताना, पालघर आगारातील महिला वाहक सौ. नेहा पाटील यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेतून आणि प्रामाणिक वागणुकीतून महामंडळातील कर्मचाऱ्यांविषयी जनमानसात सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा अधिक उजळली असून प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *