
डहाणू | सन्नान शेख
डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठा नाट्यमय बदल समोर आला असून, दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे माजी उमेदवार हाफिजूल रेहमान खान आणि विद्यमान तालुका अध्यक्ष तसेच वार्ड क्र. १ चे उमेदवार संतोष मोरे यांना शिस्तभंगामुळे काँग्रेसमधून थेट सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यात वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता अचानक स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा थेट परिणाम प्रचार, उमेदवार निवड तसेच संघटनाच्या कार्यप्रवाहावर झाल्याचे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे.
वर्षा वायडा यांची तालुका अध्यक्षा पदावर नियुक्ती
निलंबनानंतर निर्माण झालेली रिक्त जागा भरत, काँग्रेसने वर्षा वायडा यांची डहाणू तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पदी नियुक्ती केली आहे. मागील वनई जिल्हा परिषद निवडणुकीत दमदार लढत देत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या वायडा यांनी संघटनाप्रती निष्ठा, सक्रियता आणि पक्षनिष्ठ कार्यामुळे नेतृत्वाची मर्जी जिंकली होती.
त्यांच्या नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी निवडणुकांसाठी ही मोठी रणनीतिक पावले म्हणून पाहिली जात आहे.
निष्ठेला बक्षीस की संघटनेतील फेरबदलाचा ब्लूप्रिंट?
राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटना काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघटनात्मक फेरबदलाचा भाग असून, “कामगार कार्यकर्त्यांना संधी आणि अनिश्चित नेतृत्वाला दाराबाहेर” ठेवण्याचा संदेश देणारी आहे.
डहाणू तालुक्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी वर्षा वायडा हे मिशन मोडवरील नेतृत्व म्हणून पहिल्या जात आहेत.