Blog
आल्याळी येथे अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणाला नवे वळणईटीएस मोजणीनंतर प्रशासनाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष..?

पालघर | प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील आल्याळी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, जिल्हा प्रशासन आणि तहसील कार्यालयाच्या पुढील निर्णयाकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. सुमारे वर्षभर प्रलंबित असलेल्या या प्रकरणात अखेर ईटीएस मशीनद्वारे अचूक मोजणी करण्यात आल्याने प्रशासन कोणती कारवाई करते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजित गजानन मोरे यांनी दिनांक २६ मे २०२५ रोजी तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत आल्याळी परिसरात परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात गौणखनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार कार्यालयाने तत्काळ मंडळ अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.यानुसार मंडळ अधिकाऱ्यांनी २७ मे २०२५ रोजी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान करण्यात आलेल्या प्राथमिक मोजणीत एकूण ३४५१ ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचे समोर आले. संबंधित प्रकरणात प्रणय बबलू राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून २००० ब्रास उत्खननासाठी अधिकृत रॉयल्टी घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रत्यक्ष उत्खनन हे मंजूर परवानगीपेक्षा तब्बल १४५१ ब्रास अधिक असल्याचे निदर्शनास आले.प्राथमिक मोजणी ही मापन टेपच्या सहाय्याने करण्यात आली होती. त्यामुळे या मोजणीच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार अजित मोरे यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच उपसंचालक, भुविज्ञान संचालनालय, कोल्हापूर यांच्याकडे ईटीएस (Electronic Total Station) मशीनद्वारे अचूक मोजणी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने तत्काळ ईटीएस मोजणी होऊ शकली नाही. त्यामुळे हे प्रकरण जवळपास एका वर्षापासून तहसीलदार कार्यालयात प्रलंबित राहिले होते. मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर २२ मे २०२६ रोजी जिल्हा खनिकर्म कार्यालयामार्फत संबंधित जागेची ईटीएस मशीनद्वारे अचूक मोजणी करण्यात आली.प्राथमिक अहवालात आधीच १४५१ ब्रास अतिरिक्त उत्खनन आढळले होते. आता ईटीएस मशीनद्वारे करण्यात आलेल्या अचूक मोजणीत हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार का, अतिरिक्त उत्खननाची वसुली कशी केली जाणार, तसेच प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध गौणखनिज उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.