वाडा नगरात शिवजयंती उत्साहात साजरी; गडकिल्ले स्पर्धा व भव्य मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू

Spread the love

वाडा / प्रशांत गंधे
वाडा नगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाडा शहर शाखेच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


उत्सवाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची माहिती देत तरुणांना प्रेरित केले.


कार्यक्रमादरम्यान “गडकिल्ले सजावट स्पर्धा – २०२५” चा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेत सूचित गंधे व त्यांच्या टीमने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती मालवी हिने द्वितीय तर हर्ष दुरगुडे याने तृतीय क्रमांक मिळवून आपली कला सादर केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


संध्याकाळी आयोजित करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक हा उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला. मिरवणुकीत महाराजांची भूमिका कुलदीप दिवटे यांनी साकारली होती. त्यांच्या सोबत इतर युवकांनी सरदार व मावळ्यांच्या वेशात सहभागी होत ऐतिहासिक वातावरण निर्माण केले.


मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या पालखीचा देखणा सोहळा पार पडला. आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटला.
एकूणच, वाडा नगरातील शिवजयंती उत्सव पारंपरिक उत्साह, सांस्कृतिक रंगत आणि ऐतिहासिक प्रेरणेने ओतप्रोत भरलेला ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *