बोईसर पूर्वेतील वीज समस्यांवर मनसे आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांना लेखी निवेदन

Spread the love

बोईसर | रोहन राणा
बोईसर पूर्व भागातील वाढत्या वीज समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)च्या शिष्टमंडळाने आज महावितरण, बोईसर येथील उपकार्यकारी अभियंता मा. श्री. वैष्णव साहेब यांची भेट घेतली. या वेळी विविध तातडीच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची लेखी मागणी करण्यात आली.


मनसेच्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
१) लाईनमनची कमतरता:
बोईसर पूर्व भागात लाईनमनची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने वीज देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे व त्यासंदर्भातील आदेश लेखी स्वरूपात जारी करावेत.
२) ३-फेज लाईन तातडीने सुरू करण्याची मागणी:
मान येथील अमर जवान पेट्रोल पंपासमोरील गल्लीत वादळामुळे तुटलेली ३-फेज लाईन अद्याप ‘सिंगल फेज’वर सुरू आहे. या लाईनवर इंजिनिअरिंग वर्कशॉप व आटा चक्की यांसारख्या जड भाराच्या यंत्रणा चालत असल्याने वारंवार फ्युज उडणे व वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. ही लाईन तातडीने पूर्ववत ३-फेजमध्ये सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
३) जंगलातून जाणारी लाईन रस्त्यावर वळवावी:
मौजे वारंगडे, चुरी पाडा येथे एमएसईबीची लाईन जंगलातून जात असल्याने वारंवार बिघाड होत आहे. त्या ठिकाणी कोणतेही कनेक्शन नसतानाही ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही लाईन मुख्य रस्त्यावरून वळविण्यात यावी, जेणेकरून देखभाल सुलभ होईल व भविष्यात स्ट्रीट लाईटसाठी कनेक्शन घेता येईल.


४) जीर्ण विद्युत खांबांचा धोका:
बोईसर पूर्व, मान, साईनगर व दांडी पाडा येथे अनेक विद्युत खांब जीर्ण अवस्थेत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित खांबांची तातडीने दुरुस्ती किंवा बदली करण्यात यावी.
मनसेने इशारा दिला आहे की, वरील सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दिनांक २ मे रोजी पालघर येथे मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या वेळी मनसेचे पालघर उपतालुका अध्यक्ष मा. श्री. सत्यम मिथिलेश मिश्रा, उपतालुका संघटक श्री. शैलेश भुतकडे, बेटेगाव उपविभाग अध्यक्ष श्री. पवन गुप्ता, शाखा अध्यक्ष श्री. भूषण पाटील, महाराष्ट्र सैनिक श्री. वेद चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *