वाडा तालुक्यात सुतळी बॉम्ब बनवणाऱ्या युनिटमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Spread the love

वाडा | योगेश वाघ

वाडा तालुक्यातील कोणसई गावात एका जुन्या फार्महाऊस मध्ये सुरू असलेल्या सुतळी बॉम्ब तयार करणाऱ्या युनिटमध्ये आज दुपारी सुमारे १२:०० वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एक कामगार जागीच मृत्यूमुखी पडला असून ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंधे रुग्णालयात तीन जखमींना नेण्यात आले असून एक जखमीला भिवंडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सदर युनिट १० एप्रिल २०२६ रोजी नरेंद्र सिंग (रा. कुडूस) व त्यांचा सहकारी यादव यांनी सुरू केले होते. येथे फटाके तयार करण्यासाठी कच्चा माल आणला जात होता. युनिटमध्ये सुमारे ३२ रोजंदारी कामगार काम करत होते. स्थानिक पातळीवर योगेश दत्तात्रय मोकाशी (वय ४२, रा. कोणसई) हे कामकाज पाहत होते. जामघर, कोणसई, पालसई आणि अलमान या गावांतील कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात होते.या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (रा. जामघर) यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मोनिका सचिन पडवळे (रा. पालसई) यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र त्या जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

मोनिका महेंद्र जाधव (रा. कोणसई, वय अंदाजे ३० वर्षे)

जागृती जगदीश गवते (रा. जामघर, वय अंदाजे २७ वर्षे)

प्रतिभा प्रताप पवार (रा. कोणसई, वय ३० वर्षे)

मोनिका मोहन वारदी (रा. कोणसई, वय अंदाजे २५ वर्षे)

या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे. बेकायदेशीररीत्या चालवण्यात येत असलेल्या अशा धोकादायक युनिट्सवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *