वाडा नगर पंचायत हद्दीत स्मशानभूमी बांधकामात मोठा भ्रष्टाचार?;

Spread the love

स्लॅबमधील शिगा उघड दिसल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

वाडा: प्रतिनिधी

वाडा नगर पंचायत हद्दीत सिद्धेश्वर नदी किनारी उभारण्यात येत असलेल्या नवीन स्मशानभूमीच्या बांधकामावर गंभीर भ्रष्टाचाराचे सावट असल्याचा आरोप होत असून कामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता नुकतीच टाकलेल्या स्लॅबमधील शिगा (लोखंडी रॉड्स) उघड्यावर दिसून आल्या असून काँक्रीटिंग अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मशानभूमी सारख्या संवेदनशील व सार्वजनिक उपयोगाच्या बांधकामात अशा प्रकारे निष्काळजीपणा आणि निकृष्ट काम केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा किंवा ओलावा आल्यास अशा प्रकारचे कमकुवत बांधकाम धोकादायक ठरू शकते, असा इशाराही नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, निधी खर्च झाला असल्याचे दाखवून प्रत्यक्षात कमी दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. शासन व नगर पंचायतने मंजूर केलेल्या निधीचा अपव्यय होत असून ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमधील संगनमतामुळेच असे निर्लज्ज गैरव्यवहार संभवत असल्याची चर्चा सुरू आहे.

या संदर्भात संबंधित बांधकाम विभाग व नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. मात्र या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *