
पालघर | प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील विविध भागांतील युवा कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रवेश सोहळ्यात अशरफ खान, हाशिम खान, खुशाल पाटील आणि ताहीर शेख यांनी अधिकृतपणे बहुजन विकास आघाडीची धुरा स्वीकारली.

या प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील आणि पी. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षाचा झेंडा स्वीकारून या युवकांनी भविष्यात पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी प्रभाकर पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “युवकांचा वाढता सहभाग हा पक्षाच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल.” तसेच पी. टी. पाटील यांनीही युवकांना समाजकारणात सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचे आवाहन केले.

नव्या प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीला पालघरमध्ये अधिक बळ मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. स्थानिक पातळीवर युवकांचा वाढता कल लक्षात घेता आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला असून, युवकांच्या या प्रवेशामुळे पालघरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.