महिलांच्या आरोग्याला प्राधान्य;

Spread the love

रिलीफ हॉस्पिटल्सच्या शिबिरात २०० महिलांची मोफत तपासणी

पालघर / प्रतिनिधी

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रिलीफ हॉस्पिटल्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला आरोग्य जनजागृती सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८ ते १४ मार्च दरम्यान पालघर आणि बोईसर येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे २०० महिलांची तपासणी करण्यात आली.महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष उपक्रमात सर्व वयोगटातील महिलांना विविध तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. स्त्रीरोग तपासणीसह मानसोपचार, डोळे, दंत, त्वचारोग, नाक-कान-घसा तपासणी तसेच हाडांच्या विकारांवरील तपासणी करण्यात आली. याशिवाय आयव्हीएफ आणि स्त्रीरोगविषयक मार्गदर्शन, फिजिशियन सल्ला तसेच विविध आजारांच्या निदानाबाबत मोफत सल्ला देण्यात आला.या शिबिरात स्त्रीरोगतज्ञ डॉ. अमृता राऊळ व डॉ. अंकिता गौर, डोळेतज्ञ डॉ. संजना शाह, दंतचिकित्सक डॉ. श्रुती कपिल तसेच त्वचारोगतज्ञ डॉ. पूजा घोलवड यांनी महिलांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.आजच्या धकाधुकीच्या जीवनात अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

महिलांना वेळेवर आरोग्य तपासणीची संधी मिळावी आणि त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने हा आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती रिलीफ हॉस्पिटल्सचे डॉ. विशाल कोडगिरकर आणि डॉ. निशांत शेट्टी यांनी दिली.सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून गरजू महिलांना पुढील उपचार शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या शिबिरामुळे परिसरातील महिलांना तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *