
वाणगाव | प्रतिनिधी
दि. ८ मार्च २०२६ रोजी वाणगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त रामराज ग्रुप आणि राणी दुर्गावती बचत गट, विरे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वाणगाव परिसरातील कष्टाळू व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी समाजातील पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या धवलेरी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजातील महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी विकास नाईक, माजी आमदार आनंद ठाकूर, युवा नेतृत्व कॅप्टन सत्यम ठाकूर, डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्षा वर्षा वायडा तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करत महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजघडणीत आपली भूमिका अधिक मजबूत करावी, असे आवाहन केले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला वाणगाव परिसरातील महिला, बचत गटांच्या सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे महिलांचा उत्साह वाढला असून, त्यांच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.