
पालघर | प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील धनसार ग्रामपंचायतीत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चांगलाच तापला असून, सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या सर्वे क्रमांक ३२ या जागेत बांधकाम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित बाब ग्रामसभेत मान्य करण्यात आल्याची चर्चा गावात रंगली आहे.धनसार ग्रामस्थांनी या प्रकरणी लेखी तक्रार गटविकास अधिकारी कार्यालय, पालघर येथे दाखल केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले असून, हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहे.या तक्रारीची दखल घेत पालघर चे गटविकास अधिकारी भोये यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. चौकशी अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील कारवाईसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दरम्यान, गावातील नागरिकांनी पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.