बोईसरमध्ये २५ लाखांच्या कॉपर चोरी प्रकरणात नवा खुलासा, भंगार व्यापाऱ्यावर वाढविण्यात आले कलम

Spread the love

पालघर (महाराष्ट्र):

बोईसर औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीतून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे २६०० किलो कॉपर चोरी झाल्याचे सनसनाटी प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून आता एका भंगार व्यापाऱ्यावरही गंभीर धारांची भर घालण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १, २ आणि ३ यांनी परस्पर संगनमत करून कंपनीतील जेसीबी ऑपरेटरच्या मदतीने ही चोरी केली. जेसीबी मशीनच्या टूल बॉक्समध्ये कॉपर रॉड लपवून, कंपनीच्या गेटवर तैनात असलेल्या वॉचमनला वेगवेगळी कारणे सांगत मशीन वारंवार गेटबाहेर नेण्यात येत होते. अशा पद्धतीने दीर्घकाळ कंपनीतील कॉपर बाहेर काढण्यात आले.

या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत.

पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे असे निष्पन्न झाले की, कंपनीत एक्झिक्युटिव्ह लॉजिस्टिक पदावर कार्यरत असलेल्या समीर जयसिंह आहेर (वय २५) याच्या मदतीने चोरीचा कॉपर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा माल लाला नवमीलाल गुप्ता (वय ३४) या भंगार व्यापाऱ्याला विकण्यात आला.

पोलिसांनी भंगार व्यापारी लाला नवमीलाल गुप्ता याला चौकशीसाठी बोलावले असता, त्याने चोरीचा कॉपर माल खरेदी केल्याची कबुली दिली. मात्र, हा माल सध्या कुठे ठेवण्यात आला आहे किंवा त्याची पुढील विक्री अथवा विल्हेवाट कशी लावण्यात आली याबाबत त्याने ठोस माहिती दिलेली नाही.

तपासात चोरीचा माल लाला नवमीलाल गुप्ता याने खरेदी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ३१७(२) ही अतिरिक्त धारा जोडली आहे. याबाबतची अहवाल प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी, पालघर न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, चोरीचा कॉपर माल आणखी कुणाला विकण्यात आला का, तसेच या टोळीत आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *