
बोईसर | प्रतिनिधी
तारापूर औद्योगिक वसाहतीतील सुरू केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीच्या एन-७२ प्लॉटमध्ये १३ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम जेलीचे गरम द्रव्य उडून तीन कामगार भाजल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जखमी कामगाराच्या उपचारावरून सोशल मीडियावर एक बातमी प्रसारित झाली असून, त्यामध्ये रुग्णालयातील अस्वच्छतेसह कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती तपासण्यासाठी आमच्या प्रतिनिधिने कामगार उपचार घेत असलेल्या टीम रुग्णालयाला भेट दिली आणि पाहणी केली असता, कामगार एसी इकोनोमी वार्ड मध्ये उपचार घेत असल्याचे दिसून आले.कंपनीतर्फे अपघातानंतर करण्यात आलेली वैद्यकीय मदती वर कामगार संतुष्ठ असल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट पेट्रोलियम जेली हा कच्चा माल गरम करत असताना अचानक गरम द्रव्य उडाल्याने अनिश रजक, आनंद सिंह आणि रंगदार बाग हे तीन कामगार भाजले. यातील अनिश रजक यांना सुमारे दहा टक्के भाजल्याने उपचारासाठी टीमा रुग्णालयात भरती करण्यात आले.तर अन्य दोन कामगारांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, अनिश रजक यांच्या कुटुंबीयांनी ज्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, तेथील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली होती.तसेच कुटुंबीयांना वेळेवर माहिती देण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. या आरोपांनंतर संबंधित बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
मात्र, सोशल मीडियावरील बातमी च्या आधारेच कंपनीची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अथवा वैद्यकीय यंत्रणा दोषी ठरविण्यापूर्वी घटनेची अधिकृत चौकशी होणे गरजेचे होते. अपघाताच्या वेळी कंपनीकडून कोणती प्राथमिक उपचार व्यवस्था करण्यात आली होती, जखमींना किती वेळेत वैद्यकीय मदत मिळाली, रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय कोणी घेतला आणि गंभीर जखमी कामगाराला पुढील उपचार प्रक्रिया कशी पार पडली, याची माहितीही समोर येणे आवश्यक होते.
औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित आहे. त्यामुळे या घटनेनंतर कंपनीतील सुरक्षा मानके, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा प्रशिक्षण तसेच अपघातानंतरची कार्यपद्धती यांची संबंधित औद्योगिक व कामगार विभागाने तपासणी करणे आवश्यक होते.
विशेष म्हणजे, घटनेत तीन कामगार जखमी झाल्याचे समोर आले असून गंभीर जखमी कामगाराला उपचारासाठी दुसरी कडे हलवले होते ही अफ़वा असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे केवळ व्हायरल बातमी च्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी कंपनी व्यवस्थापन, जखमी कामगाराचे कुटुंबीय आणि संबंधित प्रशासकीय विभागांची बाजू समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे खरे चित्र स्पष्ट होणार होते.
कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे; मात्र त्याचवेळी अपघातानंतर जखमी कामगाराला मिळालेल्या वैद्यकीय मदतीबाबतची संपूर्ण वस्तुस्थितीही अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे गरजेचे आहे.